श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
उपनिषदकाळापासून भारतीय जीवनपद्धतीचे प्रधान वैशिष्ट्य काय आहे तर सर्व भारतीयांनी स्वीकारलेला उपासनामार्ग. मग ती सगुणोपासना असेल किंवा निर्गुणोपासना असेल किंवा नवविधा भक्ती असेल. ह्या तीन प्रकारात प्रामुख्याने विभागल्या गेलेल्या ह्या उपासनेमुळे सर्व क्षेत्रातील सर्वच जातीधर्मातील धार्मिक वृत्तीच्या स्त्रीपुरुषांना आपले मानसिक आयुष्य शांतचित्त आणि सफल करण्याचा भगवंत मार्ग सापडला. थोडक्यात काय तर हा भगवंतप्राप्तीचा उपासनामार्ग भारतीय जीवनपद्धतीत उपनिषदकाळापासून एकरूप होऊन गेला आहे. भगवंताप्रती चित्त एकाग्र करणारा हा उपासनामार्ग प्रापंचिक लोकांनासुद्धा सुलभ वाटू लागला. त्यामुळे एक झाले की उपासनेचे मार्ग जरी वेगवेगळे असले तरी उपासनेच्या मूळ अशा स्वरूपाला म्हणजे भगवंतप्राप्ती ह्या मूळ उद्देशाला कुठेही धक्का पोहोचला नाही की उपासनेचे मूळ स्वरूप कधी बदलले नाही. "उपासनेला दृढ चालवावे" हा समर्थांचा संदेश त्यामुळे घरोघरी पोहोचला. अशा ह्या उपासनामार्गाने अनेक संप्रदाय निर्माण केले. त्यातला सर्वात प्राचीन संप्रदाय कुठला तर तो दत्तसंप्रदाय दत्तसंप्रदायाचे प्रमुख वैशिष्ट्य काय तर हा लोकाभिमुख तर आहेच, परंतु तो सर्वसमावेशक आणि समन्वयवादी म्हणजे सर्वांना एकत्र करणारा आहे. ह्या दत्तसंप्रदायाचा प्रमुख ग्रंथ आहे "गुरुचरित्र" दत्तसंप्रदायाची सुरुवात श्री दत्तात्रेयांसून झाली. श्री दत्तात्रेय हा श्रीविष्णूचा अवतार. गुरुचरित्रात श्री दत्तात्रेयांची जन्मकथा वर्णन करून सांगितलेली आहे. कुणाचीही असूया वा मत्सर न करणाऱ्या अनसूयेचा आणि जेथे त्रिगुणोद्भव नाहीत अशा अत्री ऋषींचा श्री दत्त हा मुलगा. अनसूया आणि अत्री यांची विलक्षण अशी तपःसंपदाच जणू श्री दत्तात्रेयांच्या रूपाने प्रकट झाली. श्री दत्त हे अयोनिज आहेत. परमेश्वराने ह्या दोघांना श्री दत्त हा दान दिला. त्यामुळेच दत्तसंप्रदाय हा दानवृत्तीवर समर्थपणे उभा आहे. हा संप्रदाय कुठल्याही मर्त्य गोष्टींचा संग्रह करीत नाही. त्याग ही दत्तसंप्रदायाची प्रवृत्ती आहे. विरक्त विरागी वृत्तीच्या ह्या दत्तसंप्रदायातील महापुरुषांना म्हणूनच अवधूत म्हणतात.
॥ भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे ॥
प्रत्येक भक्ताला अंतःकरणापासून वाटत असते की आपल्याला आपल्या प्राणप्रिय उपास्यदैवताचे निदान एकदा तरी दर्शन व्हावे. त्यासाठी परमभक्ताला अखंड नामस्मरणात दंग व्हावे लागते. दृढ अशा उपासनेचा परमेश्वरी दर्शनाचा उपासना मार्ग अनुसरावा लागतो. खरे सांगायचे तर परमेश्वराचे वास्तव्य आपल्या हृदयाच्या गाभाऱ्यातच असते ह्याची तीव्र जाणीव एकदा का झाली की करीत असलेल्या उपासनेला भगवंत आशीर्वादाची पालवी फुटल्याशिवाय राहात नाही. विवेक आणि वैराग्य ही दोन्ही वल्ही हातात घेऊन एकदा का नामस्मरणाच्या होडीत बसले की उपासनेच्या बळावर हा भवसागर आपल्याला निश्चितपणे पार करता येतो. भगवंतकृपेने लाभलेल्या ह्या मानवयोनीची फलश्रुती खरी तर भगवंत उपासनेतच आहे.
"अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज महाराज योगीराज परब्रम्ह फक्त वासल्य अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय"
No comments:
Post a Comment